◾ शार्क प्रजाती वन्यजीव कायद्यामुळे लहान मच्छीमार सापडणार संकटात
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने शार्क च्या 10 प्रजाती तसेच पाकट, लांजा माशांच्या काही प्रजाती या वन्य जीव संरक्षण कायदा 1972अंतर्गत समाविष्ट केल्याने अशा माशांची मासेमारी केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दंड अश्या शिक्षेचे प्रयोजन असल्याने किनारपट्टीवरील मच्छीमारांना हा कायदा जाचक ठरणार आहे. मुंबई च्या ससून डॉक येथे एका व्हेल माश्याची खरेदी करणाऱ्या व्यापारा विरोधात गुन्हा दाखल झाला असून मच्छीमाराचा शोध सुरू आहे.
सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च भक्षक म्हणून शार्क माशाची ची ओळख आहे.सुमारे 500 हुन अधिक शार्क माश्यांच्या प्रजाती जगातील महासागरात अस्तित्वात आहेत.ह्या माश्यांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाऊ लागल्याने ह्या प्रजातीचे अस्तित्व अवघे 10 टक्क्यांवर आले आहे. शार्क मासे हे वर्षानुवर्षे चाललेल्या सामूहिक विलोपणातून आपले अस्तित्व टिकून असले तरीही बेसुमार आणि अनियंत्रित पणे सुरू असलेल्या मासेमारी पासून आपला टिकाव धरण्या इतपत शार्क माश्यात बदल झालेला नाही. त्यांचा दरवर्षी वाढत जाणारा मृत्युदर हा जन्मदराशी सुसंगत राहिलेला दिसून येत नसल्याचे सीएमएफआरआय च्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.सर्वाधिक शार्क च्या प्रजाती ह्या अंदाजे त्यांच्या कमाल आकाराच्या निम्म्या आकारा पर्यंत वाढल्या शिवाय परिपक्व होत नाहीत.शार्क माशांची गरबा वस्तीत चा कालावधी हा दीर्घकालीन असून तो जवळपास एक वर्ष किंवा त्याहून अधिक असतो एकाच वेळी पिलांना जन्म देण्याची क्षमता ही फार कमी असल्याने ती 2 ते 15 पिल्ले एवढीच मर्यादित असते. शार्क माशाच्या जवळपास 97 टक्के प्रजाती ह्या मानवास हानीकारक नाहीत त्यामुळे मानवजातीने सुद्धा त्यांना हानी न पोहोचवता त्यांचे सुरक्षितपणे जगण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपण सर्वांनी मिळून या माशांच्या प्रजाती त्यांची सागरावरील अधिपत्य कायम राखण्यासाठी सहकार्य करू या असे आवाहन सीएमएफआरआय च्या शास्त्रज्ञांनी केले आहे.
◾ लहान मच्छिमार संकटात
सुमारे 25 वर्षांपासून शार्क माश्यांची 80 ते 100 नॉटिकल समुद्री क्षेत्रात केली जाणारी मासेमारी जिल्ह्यात पूर्णतः बंद करण्यात आली आहे.मात्र वागरा पद्धतीच्या जाळ्यात शार्क मासे आदी प्रजाती अडकुन मृत पावल्याने मच्छिमार नाईलाजाने ते मासे किनाऱ्यावर आणीत असतात.लहान मच्छीमारांनी दालदा( गिलनेट) पद्धतीने पापलेट अथवा लहान होडीद्वारे पापलेट आणि बोंबील माश्यांच्या मासेमारीला जाळे समुद्रात टाकल्या नंतर लहान मुशी(शार्क पिल्ले)त्यात अडकतात.जाळे टाकल्या नंतर 6 ते 7 तासांनी जाळे नौकेत घेतल्यावर अनेक मासे मृतावस्थेत अडकून पडलेले असतात.त्यामुळे नाईलाजाने त्यांना आणावे लागत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.परंतु ह्या वन विभागाच्या कायद्याने मच्छिमार अडचणीत सापडण्याची भीती व्यक्त केली जात असून मच्छीमाराना योग्य मार्गदर्शन व्हावे अशी इच्छा अनेक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
◾शार्क चे अस्तित्व धोक्यात
शार्क माश्यांच्या पंखाना परदेशात मोठी मागणी असल्याने मोठ्या ट्रोलर्स द्वारे मासेमारी केली जात असून अनियंत्रित मासेमारीचा फटका ही ह्या माश्यांना बसून त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शार्क चे पंख,दाढा,घोळ,शिंगाळा,वाम आदी माश्यांच्या पोटातील भोत(हवेची पिशवी), खरेदी करण्याच्या व्यवसायावर परप्रांतीय व्यापाराची मक्तेदारी आहे.सौंदर्य प्रसाधने,उच्च प्रतीचे अत्तर,शस्त्रक्रियेचे धागे आदी बनविण्यासाठी वापर होत आहे.
◾सिएमएफआरआय ला अथवा मत्स्यव्यवसाय विभागाला कळवा
शार्क, पाकट ,लांजा आदी प्रजातीतिचा मासेमारी आणि त्यांचा व्यवसाय करणे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत दखलपात्र गुन्हा असून असा गुन्हा करणाऱ्यास तीन वर्षापर्यंत कारावास व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. शासनाने संरक्षित केलेल्या प्रजाती जिवंत किंवा मृत कळत किंवा नकळत पकडल्यास त्याची माहिती जवळच्याच सी एम एफ आर आय च्या संशोधन कार्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालयाकडे द्यावी किंवा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात कडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे ह्या लोप पावत चाललेल्या शार्क माशांच्या प्रजाती जिवंतपणे पकडल्यास त्यांना पुन्हा समुद्रामध्ये सोडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी मच्छीमाराना 25 हजाराचे बक्षीस ही देण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील ह्यांनी लोकमत ला सांगितले.त्यांनी पालघर,ठाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना कळवून त्यांच्या नौका मालकांना ह्या कायद्याबाबत अवगत करायला लावून सदरचा गुन्हा घडणार नाही ह्याची दक्षता घेण्याबाबत कळवले आहे.