◾ हत्या होताना बघ्यांची भुमिका घेणाऱ्या कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांची पोलीस दलातुन हकालपट्टी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: देशभरात गाजलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले साधुंच्या हत्याकांडप्रकरणी निलंबित केलेल्या कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रार नुसार विभागीय चौकशी मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई हून सुरत कडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची निर्घृण हत्या १६ एप्रिल २०२० रोजीच्या रात्री करण्यात आली होती. गडचिंचले येथे फुटीरतावादी लोकांनी पोलिसांच्या समोर साधूंना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या केली हा सर्व प्रकार येथील पोलिसांच्या समोर घडला होता. याप्रकरणी प्रथम कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. तर गृहमंत्री यांच्या पालघर दौऱ्या नंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले असून याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याबाबत विभागीय चौकशी मध्ये कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांना बडतर्फ करण्यात आले असून पोलीस दलातुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
◾ गडचिंचले साधू हत्याकांड घडल्यानंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती. यातच विभागीय चौकशी मध्ये आणखी किती अधिकारी यांच्यावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.