◾सापणे येथील जवळपास 2 कोटी खर्च करून बनविलेला नवीन रस्त्यांचे दर्जाहीन काम उघड
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील वाडा-मनोर राज्य महामार्ग ते सापणे गावापर्यंत 2 किलोमीटरच्या रस्त्याचे काम मे महिन्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले आहे. मात्र ठेकेदाराने केलेल्या दर्जाहीन कामामुळे चार महिन्यातच हा रस्ता उखडू लागला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात झाली असल्याने या रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरीकांन कडून संताप व्यक्त केला जात आहे.
वाडा-मनोर राज्यमहामार्गावरील सापणे फाटा ते सापणे बुद्रुक गाव हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मे.शिवशाही कन्ट्रक्शन, पालघर या ठेकेदाराच्या माध्यमातून बनविण्यात आला असून 2.3 किमी रस्त्यासाठी 1 कोटी 95 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मे महिन्यात असलेल्या लॉकडाऊनमध्ये हा रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. शासनाने करोडो रुपये खर्च करूनही ठेकेदारांच्या निकृष्ठ काम आणि ठेकेदाराने वापरलेल्या निकृष्ठ डांबरीमुळे रस्त्याची लवकरच दुरावस्था होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मे 2020 मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र लॉकडाऊनची वेळ असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूपच कमी होती. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता समजू शकली नव्हती मात्र पावसामुळळे तसेच बस आणि इतर गाड्या या रस्त्यावरून धावू लागल्याने अनेक ठिकाणी रस्ता फुटू लागला आहे. जर सुरवातीपासून या रस्त्यावरून बसेस आणि इतर वाहने धावत असती तर आत्तापर्यंत या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली असती असे मत गावातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
ठेकेदाराच्या अशा निकृष्ठ कामांमुळे शासनाचे करोडो रुपये वाया जातात आणि याच त्रास नागरिकांना देखील होत असतो. खर तर हा रस्ता बनवून पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी देखील याच ठेकेदाराची आहे. मात्र एकदा रस्ता बनविल्यानंतर ठेकेदार कधीही त्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करून निकृष्ठ काम करणाऱ्या सदर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सापणे गावातील नागरिकांकडून होत आहे.
◾ रस्ता जागेमुळे काही ठिकाणी खराब होऊ शकतो.पाऊस थांबल्यानंतर ठेकेदाराकडून तो दुरुस्त करून घेतला जाईल.
— विनोद घोलप, शाखा अभियंता-मुख्यमंत्री ग्रामसडक योजना