पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: इस्लामिक वर्षांचा पहिला महिना असलेल्या मोहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या स्मृती प्रित्यर्थ अशुरा पाळून मोहर्रम साजरा केला जातो. स्वयंघोषित दृष्ट खलिफा यजीदच्या मोठ्या सैन्यसोबतच्या युद्धात आपल्या बहात्तर अनुयायांना सोबत घेऊन लढताना इमाम हुसेन आणि त्यांचे काही सहकारी शाहिद झाले होते.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि प्रतिबंधांमुळे रविवारी मनोर परिसरातील मुस्लिम बांधवांकडून मोहर्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय उत्सव यंदा साधेपणाने साजरे केले जात आहेत.मुस्लीम धर्मीयांमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम रविवारी 30 आँगस्ट रोजी शासकिय नियमावलीनुसार साजरा करण्यात आला. रविवारी दुपारी मनोर,टेन, टाकवहाल,कटाळे,दहिसर तर्फे मनोर आणि सोनावे या गावांमधील मशिदींमध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी पाच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पालन करीत हजरत हसन-हुसेन यांच्या जीवनकाळाबाबत प्रवचन दिले.त्यानंतर मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सरबत आणि खिचडा नामक प्रसादाचे घरोघरी वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे मशिदींसमोर गर्दी झाली नाही. तसेच पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.