मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा मार्ग
दोन आठवड्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
पालघर दर्पण: नाविद शेख
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.दोन आठवड्यात महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी मेंढवन खिंडीत झालेल्या अपघातात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग ठरत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकवार गावच्या हद्दीत मुंबई वाहिनीवर शनिवारी 29 आँगस्ट रोजी पहाटे कंटेनरचा अपघात झाला होता. या अपघातात कंटेनर वरील अवजड लोखंडी कॉइल महामार्गाच्या मुंबई वाहिनीवर पडून राहिल्याने एक लेन बंद झाली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.सकवार टोल नाक्यापासून मीटरच्या अंतरावर महामार्गावर पडलेली अवजड लोखंडी कॉइल दुपारी दोन वाजता हटविण्यात आली. रस्त्यावर पडलेल्या लोखंडी कॉइलमुळे अपघाताची शक्यता असताना महामार्गाच्या ठेकेदार कंपनी कडून कॉइल हटविण्यासाठी आठ तासांचा वेळ लागला असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत झालेल्या अपघातात शुक्रवारी 28 आँगस्ट रोजी साडेचार वाजताच्या सुमारास कारचा अपघात झाला होता. या अपघातात आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. लोचन पाटील असे मयत मुलाचे नाव असून तो बऱ्हाणपूरचा रहिवासी होता.
दिवसेंदिवस मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.अपघात रोखण्यास आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ठेकेदार कंपनीने नेमलेले पेट्रोलिंग, अत्यावश्यक सेवा आणि सुरक्षा अधिकारी आपल्या कामात हयगय करीत असल्याचे दिसून येत आहे. नादुरुस्त आणि अपघात ग्रस्त वाहने महामार्गावरून हटविण्यास जाणूनबुजून दिरंगाई केली जाते. अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध क्रेन चा वापर न करता अपघात ग्रस्त वाहनांच्या मालकांना वाहने हटविण्यासाठी पेट्रोलिंग वाहनाकडून खाजगी क्रेन चालकांचा संपूर्ण क्रमांक दिला जातो.त्यामुळे तासंतास अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर पडून राहत असल्याने महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे.महामार्गावरील सुरक्षेवर लक्ष देऊन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.
● महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी ठेकेदार कंपनीने त्याच्या उप कंपनीला ठेका दिला आहे. या ठेक्यात महामार्गाचे सुरक्षा अधिकारी भागीदार आहेत. त्यामुळे अपघात ग्रस्त वाहने हटविण्यासाठी खाजगी क्रेन वापरण्याच्या सूचना पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खाजगीत दिल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
● महामार्गावरील अपघात ग्रस्त वाहने हटविण्यासाठी वीस टन क्षमता असलेली क्रेन उपलब्ध करण्याऐवजी चार टन क्षमता असलेली क्रेन ठेवण्यात आली आहे. महामार्गावर धावणारी वाहने वीस टन पेक्षा अधिक वजनाचे असल्याने तांत्रिक कारण पुढे करून अपघात ग्रस्त वाहने हटवली जात नाही.
●महामार्गावर अवजड वाहनांच्या टायर खाली येऊन मृत झालेली जनावरे,कुत्रे आदी हटविण्यात येत नाही.
◆ महामार्गावर दोन आठवड्यात झालेले अपघात
■28 ऑगस्ट मेंढवन खिंडीत कारच्या अपघातात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
■24 ऑगस्ट महामार्गावरील पेल्हार उड्डाणपूलावरील नादुरुस्त ट्रक हटविण्यात दिरंगाई केल्यामुळे ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात कोपर गावातील तरुण जागीच ठार झाला होता.
■22 ऑगस्ट दुर्वेस वैतरणा नदीच्या कठड्याला धडकून इनोव्हा कारच्या अपघातात नगरसेवकाचा मुलगा ठार झाला होता.
■13 ऑगस्ट इको आणि एसटी बसच्या अपघातात आग लागून दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. तर दोघांचा मृत्यू झाला होता.
■12 ऑगस्ट ला सातीवली गावच्या हद्दीत कंटेनरचा अपघात आणि दुसऱ्या अपघातात कार दुभाजकाला धडकून अपघात झाला होता.दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले होते.कंटेनर हटविण्यासाठी दिरंगाई करण्यात आली होती.