टाळेबंदीत सरकारी जागेवर उभ्या राहिल्या अनधिकृत इमारती; अवधनगर भागात अनधिकृत इमारतींना राजकीय व स्थानिक प्रशासनाचे संरक्षण
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील बोईसर महसूल क्षेत्रात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे असून टाळेबंदीत सरकारी जागेवर अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. सरकारी जागेवर सरावली हद्दीत उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामाकडे महसूल विभाग देखील डोळेझाक केली असून अशा अनधिकृत बांधकांना राजकीय व स्थानिक प्रशासनाचे संरक्षण असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.
सरावली हद्दीत येणाऱ्या अवधनगर भागात टाळेबंदीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी मोनिका गल्ली, शिफ्फा मेडिकल गल्ली व मुख्य बोईसर- एमआयडीसी रस्त्यालगत असे साधारण 15 ते 20 ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनधिकृत बांधकामाची तक्रार केली तरच याठिकाणी कारवाईच्या नावाखाली बांधकामाला नोटीस बजावली जाते. नोटीस बजावण्याच्या पलिकडे आजवर ठोस अशी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यातच याभागात सरकारी जागेवर सुरू असलेली अनधिकृत बांधकामे थांबवली देखील जात नाही. स्थानिक पातळीवर अशा बांधकामावर दुर्लक्ष झाल्यानंतर काही महिन्यातच जोमाने ही बांधकामे पुर्ण केली जातात. विशेष म्हणजे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची मर्जी राखुनच ही बांधकामे खुलेआम पणे पुर्ण केली जात असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.
अनधिकृत बांधकामाला स्थानिक पातळीवर नोटीस बजावून बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालघर तहसीलदार यांच्या कडे प्रस्ताव पाठवला जातो. मात्र गेल्या पाच वर्षात अवधनगर भागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई बाबत एकदाही आदेश आलेला नाही. मुळात सरकारी जागेवर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर असताना देखील कारवाई कडे दुर्लक्ष केले जाते. सरावली भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम यांना स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांची देखील साथ असून महसूल प्रशासन देखील भूमाफियांनी त्यांची मर्जी सांभाळून घेतल्यानंतर अशा बांधकामांना इमारत पुर्ण होईल पर्यंत तिथे फिरकत नसल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात याभागात एकही सरकारी जागा शिल्लक राहणार नसल्याने अशा भुमाफियांन वर पालघर महसूल विभाग काय कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
◾ ग्रामपंचायती कडून भूमाफियांंना सुविधा
सरावली ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 5 हजार हुन अधिक अनधिकृत बांधकामे असून सरकारी जागेवर उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांना सरावली ग्रामपंचायती कडून विद्युत नाहरकत दाखला व पाणीपुरवठा दिला जातो. स्थानिक सदस्य याबाबत शिफारस करत असून मोठी आर्थिक गणिते यासाठी केली जातात. यातच येथील सरकारी जागेवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये यासाठी सरावली ग्रामपंचायत कडून बोगस गावठाण दाखला दिल्याचा प्रकार याअगोदर उघडकीस आला होता. याठिकाणी उभे राहिलेले अनधिकृत हाँटेल खुद्द ग्रामपंचायत सदस्यांचे आहे. अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यानंतर यातच अशा बांधकामाला जोड रस्ता व गटाराचे काम देखील ग्रामपंचायती कडून केले जात आहे.
◾ अवधनगर येथील अनधिकृत बांधकाम बाबत पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना संपर्क साधला असता त्यानी मंडळ अधिकारी बोईसरचा यांच्या कडून माहिती घेतो असे सांगितले.
◾ ग्रामपंचायतीने अनेक बांधकामांना नोटीस बजावल्या आहेत. याठिकाणी सरकारी जागा असल्याने महसूल विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच सदस्यांने बांधकाम केलेल्या अनधिकृत इमारती बाबत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला आहे
— सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी सरावली